Thursday, April 18, 2019

सर्वांना स्वतःसारखं बनवण्याचा प्रोग्राम 

सगळेच एकमेकासारखे दिसायला लागले 
तर स्वतःला ओळखता येईल का 

नशीब समज 
हा प्रोग्राम फेल जातो 

नाहीतर खाणारा तू बनवणारा तू 
कचरा उचलणारा तू बायको तू मुलं तू 

सत्ता अंतिमतः बोअर करते 
सपाट करते 

म्हणूनच शेजारचा तुझ्यासारखा नाही 
म्हणून स्वतःला भाग्यवान समज 

जगाचे सौंदर्य 
आपण एकमेकासारखे नाही आहोत 
म्हणून टिकून आहे 
श्रीधर तिळवे नाईक 

 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून
--------------------------------------------------------------------
फक्त कविता लिहितांनाच कवी असण्याचा प्रयत्न केला 
पण आपल्या स्वभावाने तो हाणून पाडला 

आता स्वभाव बदलून देणाऱ्या दुकानाच्या शोधात निघालोय 
तर लोक म्हणतायत 
असं कधी कुठं दुकान असतं काय ?

त्यांना कसं सांगावं आपला हळवेपणा कसा मांजर बनून 
यशस्वीपणाच्या आड येतो 
किंवा लहरीपणा कसा समोरचा सोनं देत असतांना 
त्याला आपट्याची पान देऊन 
पळून जात असतो 

बरं ज्यांना कवी म्हणून आपण माहीत नाही 
त्यांचं तर एकच पालुपद 
" तुझं काय चालतं गड्या काई केल्या कळत नाही 
क्षणात तुघलक क्षणात शिवाजी "

कवी लोकही आपल्या झक्कीपणाला कावलेले 
"तू कावळ्याच्या नाकावर चिमण्या शोधणार 
आणि मिरजकर तिकटीवर दिल्लीची तिकीट शोधणार 
आता राष्ट्रपती भवन काय तुझ्या जैन गल्लीत शिफ्ट करायचं ?"

सालं खूप वाटतं स्वभावाचं कायतरी व्हावं 
पण स्वभावाच्या नुसत्या कविता होतात साल्या 

माणूस मरतो तेव्हा त्याचा स्वभावच मरत असावा बहुदा 
किंवा स्वभाव मेला कि माणसे मरत असावीत 

मर 

श्रीधर तिळवे नाईक 

 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून 

मी सर्वांच्याच विरोधात आहे 
मी सर्वांच्याकडून मारला जाईन 

जुनं ते सोनं म्हणणाऱ्या काळात 
मी 
नवं ते प्लॅटिनम म्हणत 
ओरडत चाललोय 

गंजलेल्या तलवारींना फक्त गांजलेले लोक कवटाळतात 
खरा क्रांतिकारी नवी शस्त्रे तयार करतो 

माझे सर्वांच्यावर प्रेम आहे 
आणि प्रेम हत्येला निमंत्रण देते 

मी कधीही मारला जाऊ शकतो 
ही खबर तर रोज खबरी देत असतात 

सर्वांच्यावर प्रेम करणारा संन्यासी 
हा सर्वाधिक डेंजरस असतो कुठल्याही युगात 

माझा प्रतिकारही प्रेम आहे 

म्हणूनच मी प्रेमसज्ज होऊन सिद्ध आहे मरायला 

मारतांना गंजलेल्या तलवारी घेऊन येऊ नका मित्रांनो 
निदान न्यू मेक  रिवोल्वर वा पिस्तूल घेऊन या 

मरतांना तरी समाधान द्या 
मी नवता हातात धरायला भाग पाडलं 

श्रीधर तिळवे नाईक 


 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून 

No comments:

Post a Comment