Thursday, September 13, 2018


25 कवीला फाशी देताना / १८ ऑक्टोबर १९८५ बेन्जामिन मोलाईजला फाशी दिली गेली तो  दिवस
 श्रीधर तिळवे -नाईक 
कवीला फाशी देताना 
कोणत्या दिवसरात्रींची वेळापत्रक मांडलीत तुम्ही ?
कसे धजावला वर्तमानपत्रांच्या रंगमंचावर 
भिंतींची सामुहिक नृत्ये सादर करायला ?

तुम्हाला माहीत नाही का 
कवीला फाशी दिल्याने शब्द मरत नाहीत ते !


मूर्खांनो ,
ते आता अधिकच झपाट्तील बोधीवरील मुन्जाने 
वाढवतील आपल्या वयाचा वेग 
जोडतील अक्षरांच्या रथांना आपल्या फुफ्फुसाचे पंचतारांकित अश्व 
भरतील बाळाच्या अंगाईत ओठांचे युद्धशंख 
देतील चिमुकल्या डोळ्यांना आपल्या गगनवेधी दुर्बिणी 
आणि येतील एक दिवस तुमच्या राजदंडावर 
आपल्या पावलात माणसांचा जमाव घेवून 


काय करणार आहात तेव्हा ?
कुठे जाणार आहात ?
परदेशात ?
आकाशात ?
पाताळात ?

कुठेही जा 
शब्द सर्वत्र हजर असतील 

शब्दांपासून पळून जाण  एवढ  सोपं नसत 
कवीला मृत्युदंड देण्याइतकं तर नसतच नसत 

ह्यापुढे सर्वत्र शब्द तुमचा पाठलाग करतील 
मृत्यूच्या उत्खनलेल्या शहरात तुम्हाला घेराव घालतील 


सिद्ध करतील 
कवीला फाशी देवून शब्द मरत नसतात 
कवीच्या आत्म्याला अंगावर चढवून 
ते वावरत असतात 


आता तुम्ही कुठेही जा 
तुमचा 
मृत्यू 
निश्चित आहे 



श्रीधर तिळवे नाईक 
 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार
पॉप्युलर प्रकाशन १९९१-९२ ह्या कविता संग्रहात प्रकाशित 

26
माझ्या साऱ्या कविता 
शब्द मुळातच असतात परके अर्थही  अनोळखी बनत जातात
तरीही माझ्या साऱ्या कविता माझ्याच दिशेने प्रवास करीत असतात 

लिहीलं काय लिहिलं काय, केलं काय अन केलं काय 
आज पसारा, उद्या पाचोळा, जगलो काय अन मेलो काय 
मी काय, माझं अस्तित्व काय, सारे काही जाणीत असतात 
माझ्या कविता माझ्याच दिशेने तरीही प्रवास करीत असतात 

कोठून आलो, कोठे जाणार, गेलो तरी काय जाणणार 
जगलो तरी काय होणार, झाले तरी कुठवर टिकणार 
सवाल  सारे  ओळखीचेच, पण आयुष्य अनोळखी करीत जातात 
माझ्या कविता माझ्याच दिशेने तरीही प्रवास करीत असतात 

27
मी केवळ स्वतःत रमू शकत नाही 
सॉरी 
मी केवळ स्वतःत रमू शकत नाही 
सॉरी 

मलाही आवडतात ह्या नद्या, हे पहाड, हे आकाश, हे वृक्ष, ही फुले 
हा मातीचा समुद्र, ही समुद्राची माती 
मलाही ऐकू येतो तुमच्याप्रमाणेच 
अज्ञात झऱ्याचा पावा

मलाही वाटतं बासरीतून सात सूर  उचलून 
आभाळाच्या एकेका डोळ्यात भरावे एकेक 
समॄद्ध  इंद्रधनुष्य  
मीही रमतो जाणिवेचे स्तर, प्रस्तर उलगडण्यात 
अंतरीक्षाचे अबोल संभाषण ऐकण्यात 
पृथ्वीच्या गर्भात हालणाऱ्या मुलांच्या  
हातापायांचे आवाज ऐकण्यात 

पण सॉरी 
मी केवळ त्यातच रमू शकत नाही 
गर्भाशयात नाळेने मला घातलेली भुकेची शपथ 
मी विसरू शकत नाही 

वडिलांच्या आसवांत गवसलेला आतड्याचा दोरखंड '
मी तोडू शकत नाही 
आईची गजरा विकताना झालेली जीवघेणी परवड मी फेकू शकत नाही.  

खरं असेल 
तुमच्या मतानुसार मी भ्रष्ट झालो असेन 
माझ्या मूळ पिंडापासून पतित झालो असेन 
पण सॉरी 
मी स्वतःत रमू शकत नाही
लिंगाची ओळख झाली तरी 
संभोगासाठी प्रतीक्षा वाळत घालणाऱ्या 
युवक युवतींना पाहून 
भरून येते माझे मन
अन्न,वस्त्र,निवारा 
अवनीच्या भूगर्भात सापडलेले तीन ब्रह्य शब्द 
जेव्हा माणूस खात भटकतात 
दशदिशांच्या नाळेतून 
तेव्हा गलवलुन येत मला


तुम्ही बाहेर वळाल?
वळा 
इथल्या एकेका अन्नाच्या दाण्याची ओळख पटण्यासाठी 
बुद्धालाही द्यावे लागतील करुणेचे संदेश शतकशतकभर
उपनिषदांच्या सशक्त तुकड्यांना 
वस्त्रासाठी झालेली परवड पाहून परिशिष्ट जोडावे लगेल.
अपरीग्रहपालनासाठी तपस्या नागवी होऊन करावी म्हणून
आकाशात कोणी बाप खरोखरच असेल तर 
येशूला जन्म देण्यासाठी 
त्याला करावा लागेल मेरीशी संभोग फुटपाथवर घर मिळत नसल्याने

हे आणि असे कित्येक  सत्याचे बिंदू 
ह्या वर्तुळात भटकत असतील तर त्यांना 
सांगताही येणार नाही 
या वर्तुळाचा आरंभ कुठला,  मध्य कुठला आणि अंत कुठला ते

म्हणून म्हणतो
मी केवळ आत वळू शकत नाही

ह्या वर्तुळाच्या बिन्दुबिन्दुवर असलेले 
भिंतीचे भीतीदायक काफिले 
पुसून टाकण्याचे सामर्थ्य मला कमवायचे आहे 
उद्दालकापासून मार्क्सपर्यंत साऱ्यांच सनातनी थडगे 
अंतराळात ढकलायचे आहे

तेव्हा 
तुम्ही मला श्रद्धांजली वाहून मोकळे होऊ शकता 
त्याने मी मारणार नाही 
कारण 
शब्दांत स्वतःचा प्राण लपवण्याचा मूर्खपणा 
केवळ तुम्हीच करू शकता


श्रीधर तिळवे नाईक 
 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार
पॉप्युलर प्रकाशन १९९१-९२ ह्या कविता संग्रहात प्रकाशित 

28

तुम्ही कलावंत असाल तर . . . . . . . 
तुम्ही कलावंत असाल 
तर कृपया मला भेटू नका

असतील 
साऱ्या सृजनाच्या खिडक्या 
तुमच्या घरांनाच जोडलेल्या असतील 
तुमचा प्रत्तेक श्वास 
एक नव्हे, दोन नव्हे, चांगला दहा मैल धावत असेल 
पण का कुणास ठाऊक 
मला तरी तुमच्या सत्यशोधत 
आत्ममाग्नतेच्याच रेश्या अधिक गवसल्यात 
खरं सांगू
तुम्ही जेव्हा म्हणता 
जसा मी प्रत्यक्षात आहे तसाच मी शब्दात आहे 
तेव्हा मी हसतो 
खरंतर युद्धाचे नियम आणि खेळ्या 
तुम्हाला माहित नसतात
रंभूमिचा आकारही नीट पहात नाही तुम्ही 
तरीही तुमच्या गप्पा खिलाdu वृत्तीवर 
 तुमचे खाजगी चेहरे  पाहताना 
कितीवेळा तरी माझे डोळे आत्महत्याच करतात 
तुम्ही रडता तेव्हा तर मला आधिकच  हसू येत 
खरेतर तुमच्यात काहीच नसत 
आणि तरीही सूर्य खाजगी खिश्यात टाकून हिंडण्याच्या
गप्पा तुम्ही मारता
अन दिवसाला झालेली जखम  तुमचं  रक्त पिऊन
अधिकच पुष्ट होते

किती मुखवटे असतात तुमचे
बायका, मित्र, घर
किती स्वार्थी असता तुम्ही यांच्याबाबत
स्वत : च्या अधिकाराचे पाषण   उंचावत
किती सहजपणे  निर्माण करता तुम्ही व्यवस्थारोग
आणि आत जमलेल्या रुग्णांना पाहून तुम्ही म्हणता
या माझ्या कलाकृती आहेत
त्यावेळी अन्तरिक्षांनी सोडलेले नि:श्वास
फक्त क्षितीजाच्या  कानांनाच ऐकू येतात
पण तुम्हाला त्याची जाणीवही नसते

रंग, सूर, शब्द, मुद्रा
ठीक आहे
तुम्ही फक्त त्यावरच बोला
त्यापलीकडे असलेले अन्नाचे भोग
वस्त्रापासून झालेले साथीचे रोग
आणि निवारा नाही म्हणून रस्त्यावर होणारे  संभोग
तुम्ही पाहू शकणार नाही
कारण तुमचे दोन्ही डोळे
विसंगतीच्या पट्ट्या लावून स्वतःत झोपी गेलेत
आणि तुमचे सारे अश्रू
तुमच्या कलाकृतीच्या पायाशी मारून पडलेत

तेव्हा कृपया मला भेटू नका
माझ्या घरांच्या खिडक्या सृजनासाठी खुल्या नाहीत
आणि
माझ्या दारातून फक्त उपाशी माणूसच आत येऊ शकतो.


श्रीधर तिळवे नाईक 
 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार
=======================================================
आपली काही नैतिक हरकत 
पितामह
चालले आहे लिंग माझे कुमारी …शी संभोग करायला बहरून 
आपली काही नैतिक हरकत बाप म्हणून, बाप म्हणून?

तुम्ही म्हणाल लग्न करावं, मग पाळावा शरीरधर्म 
आपली संस्कृती आत्मीय आहे, जपायला हवे तिचे वर्म 

पण पितामह
तुम्ही सांगा, संभोग आणि लग्न यांचा संबंध काय?
काय? आहे  जसा गोठा आणि जशी गाय
तुमची व्याख्या, लग्न म्हणजे संभोगाची तडजोड म्हणून 
आम्हास मात्र हवा संभोग शरीराचा हक्क म्हणून 
तेव्हा सॉरी पितामह पटत नाही,
तुम्हीच सांगा किती काळ ठेऊ मी मला आवरून 
चालले आहे लिंग माझे कुमारीशी संभोग करायला बहरून

तिची सम्मती आहे का, प्रश्न किती काळ विचारणार 
भरात आली जवानी की अहो प्रत्येक योनी दवारणार 
हरकत घेतली तर सांगेन संभोग सामाजिक नसतो म्हणून 
देईन पटवून-इतिहास खणून. भुगोलच जिवंत राहतो म्हणून 

तेव्हा सॉरी पितामह,
देतो खात्री,
संभोगाआधी थारारेल पण ती जाणार नाही अगदीच बावरून 
चालले आहे लिंग माझे कुमारीशी संभोग करायला बहरून 

आपली काही नैतिक हरकत बाप म्हणून बाप म्हणून?

श्रीधर तिळवे नाईक 
 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार
पॉप्युलर प्रकाशन १९९१-९२ ह्या कविता संग्रहात प्रकाशित 

चंद्र दर एकोणतीस दिवसांनी 
 
चंद्र दर एकोणतीस  दिवसांनी 
आत्महत्या का करतो 
ह्या गहन प्रश्नावर विचार करत होता तो 
त्याला तसे पाहून 
दिवसाने किरणाच्या काड्या कानात घालून
त्याला जागं केलं 
म्हणाला पोरगी  शोधायला सुरवात कर 

त्यानं  वक्षाच्या बाजारात 
वक्षाच्या भावाची चौकशी केली 
कळालं
एका वृषणात दोन वक्ष आरामात मिळतात 
वृषण आणि कंपनीच्या एका शेअरची किंमत 
दहा तोळे सोनं आणि दोन्हीकडचा खर्च होती
थोडक्यात 
वृषणातील निसर्ग नोटात हिंडत होता
रुपयासाठी माणूस लग्नमंडपात भांडत होता

एक कॉलेज 
तिथं ती भेटली 
तिनं आभाळाच्या फडक्यानं 
त्याची पापणी पुसली 
आणि ओर्डर दिली 
लक्षावधी सुर्य, हजारो पौर्णिमा आणि एक प्रेमपत्र 

ती आणि तो 
त्यांनी चित्रपट पहिले 
नातेवाईकांवर चर्चा केली 
तो बोअर झाला 
ती बोअर झाली 
तिने आपल्या श्वासांचे शर्ट  घालावयास दिले 
त्यांनं घरी येऊन पहिले 
शर्ट फारच आखूड होत होते

तर रात्री 
संभोगासारख्या निघून जात होत्या
फॅमिली रूम
तो म्हणाला
गुणसूत्रे झिंदाबाद 
ती म्हणाली,
महालग्न आणि दोन पोरं झिंदाबाद 
तो म्हणाला
समाज झिंदाबाद 
ती म्हणाली,
ताज झिंदाबाद 
तो म्हणाला 
नीती झिंदाबाद 
ती  म्हणाली 
तडजोड झिंदाबाद 
तो म्हणाला
मग फूट 
ती म्हणाली 
फुटते 
मग त्यांनी ऑर्डर दिली,
दोन स्पेशल मृत्यू 
चहात घालून 
साखर जरा जास्त 
मग ते थोडे थोडे फुटले 

तिने लग्नपत्रिका हातात दिली 
त्याने लग्नपत्रिका पायात घेतली 
त्यांनी त्या अक्षता हातावर दिल्या 
त्याने अक्षता डोक्यावर टाकल्या 
तिने सात पावलं टाकली 
तो सूर्याच्या आरामखुर्चीत चिरूट ओढत बसला 
ते म्हणाले 
रेकॉर्डरूम सांभाळा 
तो म्हणाला
मुकेश तलत लावेन 
ते म्हणाले
राव ! लग्नप्रसंग आहे रफी किशोर लावा 
मग त्याने श्रीकृष्ण वासुदेव यादव यांना फोन केला 
चंद्राची रेकोर्ड मागवली 
रेकोर्ड वाजत राहिली 
वाजत राहिली 
वाजतच राहिली 
कविता म्हणून 
गाजत राहिली 
गाजत राहिली 
गाजतच राहिली 

नंतर बरोबर एकोणतीस दिवसांनी तो 
वेश्यागृहात सापडला 
शेअर्सची खरेदी विक्री चालूच होती

श्रीधर तिळवे नाईक 
 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार
पॉप्युलर प्रकाशन १९९१-९२ ह्या कविता संग्रहात प्रकाशित 
मुलींनो 
मुलींनो वयात येऊ नका 
आपल्या योनीतील सूरवंटाची फुलपाखरं होऊ देऊ नका 

निष्पापपणे संभोग करावेत इतके मुक्त नाहीत इथले आसमंत 
शिकवलेलंही नाही इथल्या योद्ध्यांना नीरोधची कवचकुंडलं कशी वापरावीत ते 

तेव्हा एक चूक - एक संभोग 
एक संभोग     - एक अपत्य 
एक अपत्य     - सह्स्रभर अन्न,
                       शतकभर वस्त्र 
                       आणि दशकभर निवारा 
हे सारंच इथल्या दुष्काळी प्रदेशाला परवडायचं नाही 

म्हणून म्हणतो मुलींनो, कृपया 
वयात येऊ नका 
आपल्या योनीतील सूरवंटाची फुलपाखरं होऊ देऊ नका

श्रीधर तिळवे नाईक 
 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार

पॉप्युलर प्रकाशन १९९१-९२ ह्या कविता संग्रहात प्रकाशित 


''डोक्यावर आहे खुंटी मारल्यागत स्वर्ग 
पायाखाली अजाण जमीन 
मी श्रीधर शांताराम तिळवे 
उर्फ षंढधर शून्यराम अस्तित्वे 
बाहेर जायचं का ?''
''राजू , फिरून ये जरा ''
''काय घरात पडलायस भूकेसारखा ?''
''इथं सर्वच जातीधर्मवासियांना 
प्रवेश मिळेल हां ''
''टेबलावर साली जगाची धूळ ''
''दोन भजी एक चहा आण ''
''साला प्रत्येकाचं लाईफ कांदाभजीसारखं 
एक भजी दुसऱ्या भजीसारख नाही ''
''रेडिओवर रफी चौदहवी का चांद 
गळ्यातून ओततोय चहात ,चहा प्या ''
'' लताचा गंधार म्हणजे …. ''
'' भीमसेन जोशींचा निषाद म्हणजे …''
''च्यायला !''
''भूखको साला मारती हैं आँतको ठण्डा करती हैं 
अगर ये चाय  होती तो भूखे कहाँ जाते ?''
''हमभी फरमाते हैँ ''
''नाम ?''
''राजू दयेन्द्र ''
''फरमाईये ''
''सूर्यामध्ये आयुष्याचे कितने दिन मर  गये 
काळाचे किती हत्ती आतड्यातून गुजर गये ''
''व्वा !''
''  जाने उसकी कितनोने मारी 
फिरभी कहती हैं मैं हुं कुंवारी ''
श्शी !
''मैने जो डाला उसमे थोडासा पानी 
कहने लगी हाय ! मेरी गयी रे जवानी ''
''अश्लील ! अश्लील !''
''वास्तववाद !''
''फुस्स !''
'' The life is the greatest joke 
and wife is the best entertainment ''
''साली दहा रुपये दिल्याशिवाय 
देत नाही मारायला बायको असून ''
'' स्त्रीमुक्तीची वाटचाल … ''
'' स्त्रीची चाल बघा मग वाटचाल …… ''
'' श्री काही सुचत का ?''
''हाथमे रुमाल लेकर  रही हैं वोह 
 जाने किसके कफ़नकी तैयारी हैं ये ''
''व्वा !''
'' और एक ''
'' चली गयी वो कुछ खुदको संभलकर कुछ हमे बदलकर 
हम तो खडे रहे थे जैसे जिंदगी जा रही थी अपनी ''
'' इंग्रजी रद्द झालीच पाहिजे ''
''इंग्रजी लावणी ऐकणार का ?''
''या रावजीची चाल लावायची ''
''oh my dear , come here 
I 'll give my love ,
love , love , love , 
please come in my , please come 
in my ,  come in my cave 
Oh My dear …. ''
'' आपुन साला जाणार कुठ ?''
''बॉर्न सर्टिफिकेटपासून डेथ सर्टिफिकेटपर्यन्त ''
''श्री बीए तरी नीट कर ''
'' एकच प्यालाची वाट लावली वरदन ''
'' गडकऱ्यान्च्या प्यालाला शांति लाभू दे ''
''अमिताभचा एक डायलॉग ,
मेरे ज़ख्म जल्दी नहीं भरते ''
'' संजीवने खल्लास किया रे त्रिशूलमे ''
''एकदम खल्लास ''
'' ह्या देशाचे भवितव्य तुमच्या हातात आहे ''
'' श्शी ! कुठ काय  लिहितात कार्टी ?''
''होतीच ना ही कोरी पाटी ?
आम्हीच भरली ती अंधारान …. ''
'' लोकसंख्येचा प्रश्न …''
'' युवक एकता झिंदाबाद ! ''
'' मी बिस्मिल्ला खान ऐकणार आहे आज ''
''इंदिरा गांधीकी जय ''
''तुमच्या …. च्या पुच्चीची जय  रांडेच्यानो ''
'' दम मारो दम….  ''
'' जन गण मन …… ''
'' हरे राम हरे कृष्ण …. ''
''झीनतच्या मांड्या …. ''
'' विझत चालली साली कम्युनिस्ट क्रांतीसारखी …. ''
'' स्त्रीमुक्ती ……. ''
''पाणी !पाणी !''
''आनंदयात्री गावा गाणी ''
''खुर्चीच आमची तुमची राणी ''
''तत्वज्ञान आवश्यक …… ''
'' संशयवादी होतो लोक मृत्युनंतर म्हणाले 
ईश्वराला मृतात्म्याकडून शांती मिळू दे ''
'' व्वा तिळवे ! कुठून उचललात हो ?''
''गंगे , परसाकडला माझी पाळी हाय सांगून ठेवते …''
''तुमबिन जाऊ कहा दुनियामे आके … ''
''गंगे , आली पाळी …''
'' कुछ  ना फिर चाहा सनम तुमको चाहके … ''
'' म्युनिसिपालटीचा मुडदा बशिवला ह्या …. ''
'' पाणीबी वहात नाय नळातन … ''
''काय रे ही इंडिया ?''
'' घाम फुट्या साला … ''
'' अनुप जलोटाची चांद अंगडाइया लावा जरा ''
'' कथेला जाम विषय ''
'' मॉडर्न पेंटिंग … ''
''कागदावर मुता दोन मिंट 
जे तयार होईल ते मॉडर्न पेंटिंग ''
'' आन्तरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित होण्यासाठी 
अलिप्तता राष्ट्रांची  ………''
'' टै टै टै .......  ''
'' मी म्हणते रडवी पोर आणावीत कशाला ?''
''कवी का ?''
''हैलो , हैलो 
हरवलेले शब्द एका योनीत सापडले 
झवा आणि घेवून जा ''
'' हैल्लो , जपत जावा शेठजी 
साखरेचा भाव तुमच्या प्रकृतिवर ''
''भगवा झेंडा पडला ... ''
'' लाल हजर आहे ''
'' लाल पडला ..... ''
'' भगवा हजर आहे ''
'' hello डार्लिंग … ''
'' निरोध विसरलात ना ?
किसेस घ्या फक्त . कुटुंब नियोजन आहे . ''
'' संभोगातून समाधी हा भगवान …''
'' बॉल काय आहेत रे ? बाप रे बाप ! …. ''
''अक्षरश : हिमालय ठेवल्यासारखा वाटतोय.  ''
'' हिमालयातील संन्यासी लोकांनी … ''
'' विसंगतीतून सुसंगतीकडे जाण्याचा 
मानवाचा सनातन प्रयत्न आहे हे मिस्टर …… ''
''कुठला रांडेचा बोलला हा … ''
हुश्श !


शून्य !
शून्य !
शून्याबाहेर शून्य 
शून्यात शून्य 
शून्यही शून्य 
पू  
र्ण   
वि  
रा

 
श्रीधर तिळवे नाईक 
 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार
पॉप्युलर प्रकाशन १९९१-९२ ह्या कविता संग्रहात प्रकाशित 

अंबाबाई

अंबेची महालक्ष्मी होतांना 
म्हंटल तर काहीच होत नाही 
म्हंटल तर बरंच काही होतं 

मुळांत दगड हलतात 
पैश्यात पृथ्वी जळते 
एक जग रद्द होतं 
इतिहासाच्या चेहऱ्याचं नाक काढून घेतलं जातं 

तू शक्ती म्हणून तुझ्यासाठी 
आणि तुझ्या नवऱ्यासाठी बांधण्यात आलेला रंकाळा 
घटस्फोट घेतो 
आणि तू थेट तिरुपतीकडं निघून जातेस 

हिला घटस्थापना म्हणायचीये त्यांना म्हणू दे 

एका सफेद चादरीवर माझी इंद्रिये मरून पडलेत 
त्वचा परत करून साप निघून गेलाय 

मठ्ठ लोकांचे देवही मठ्ठ असतात 

माझा सत्य बोललो म्हणून मर्डर करण्याचा प्रयत्न झालाय 

एक स्त्री चकित होतीये 
आणि रडतीये 

मज्जा जुळवत मी पडून आहे तुझ्या मांडीवर 

तू ना मला रंधा मारतीयेस 
ना पॉलिश करतीयेस 

श्रद्धा बदलली गेली म्हणजे नेमकं काय काय बदलतं 

तू शंकराशी भांडायचीस 
लक्ष्मी अशी थेट भांडू शकते का ?

मी तुला कधीही शंकराचे पाय चेपताना पाहिलेलं  नाही 
आणि महालक्ष्मी म्हंटल कि मला ती विष्णूचे पाय चेपतांना दिसते 

लोक देव निवडतांना फक्त देव निवडत नसतात 
ते एक व्हॅल्यू सिस्टीम निवडत असतात 

आम्हा करवीरकरांची व्हॅल्यू सिस्टीम चेन्ज करण्याचा अधिकार 
कधीपासून बडवे पार पाडू लागले ?

शाहूंचं नाव अभिमानानं घेतांना 
हा बदल कसा स्वीकारावा ?

शरीराला टाके घालून 
ते वस्त्राआड लपवता येतील 
पण काळजाचे काय ?

शक्तीपीठं कधीपासून वैष्णवांची व्हायला लागली ?

माझ्या खरखरीवर तेल घालून तिचा आवाज थांबत नाहीये 

पांढरे कावळे काळ्या कावळ्यांना बाजूला सारून कुठं चाललेत ?

त्यांचे शुटिंग केंद्रस्थानाच्या मध्यभागी 

बदलांचे अवशेष काही दिवस टिकतील 
मग नाहीसे होतील 

करवीरनिवासिनी अंबाबाई जाऊन 
करवीरनिवासिनी महालक्ष्मी 

माती तिचे गुन्हेगार लक्ष्यात ठेवत नाही 

जे जड आहे ते उडतंय 
जे हलकं आहे ते बुडतंय 
ह्यालाही मी तुझी माया समजायचं काय ?

झाडांनीच ऋतू विकायला सुरवात केल्यावर 
माळ्यांनी काय करायचं ?

नफ्याचा वास घेत हिंडणाऱ्यांना आवर कसा घालावा ?

लोकांनीच स्वतःच्या सत्वावर रेड टाकल्यावर 
कुठल्या न्यायालयात जावं ?

तू एक स्टेप मागं घेतलीस 
आणि ह्यांनी तुझी चाल बदलली 

माझ्या अंगाला तुझी राख लागलीये 

मी कौलपूर सोडतोय 

कोल्हासुराच्या दंतकथेत मी कधीच बुडालो नाही 
पण ही महालक्ष्मी जिला मी कधीच कौल लावला नाही 
माझे तुकडे करतीये 

तूच आता कौल दे मुंबईचा 

कोल्हापूर सोडल्याने मेलो 
कि 
मुंबईत गेल्याने मेलो 
ह्याने काय फरक पडणार आहे ह्या शहराला ?


श्रीधर तिळवे नाईक 
श्रीधर तिळवे नाईक 
 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून 

=================================

भीतींची मिती भिंती बांधतिये तोडतीये 

वाढीचा शेवट काय होणार ह्याची भीती 
वाढच होणार नाही ह्याची भीती 
वाढीचा उगम नीट सापडत नाही ह्याची भीती 

डीएनए चुकीचे दान टाकून कर्णासारखे मरून जाईल ह्याची भीती 
नशिबाची अलॉटमेंट चुकीच्या पेशीला दिली जाईल ह्याची भीती 

आयांच्या पदरात तानपुरा वाजवणारी भीती 
बापांच्या पॅन्टीत सायलेंट बॉम्बची धडधड पिकवणारी भीती 

कित्येक पिक्चर इंटरव्हलनंतर सुरूच झालेले नाहीत 
कोल्ह्यांनी सादर केलेलं नाटक सिंहाच्या डरकाळीची जाहीरात  करतंय 
आणि हाऊसफुल होतंय 

वाढ आशीर्वाद असेलच असं नाही 
कॅन्सरचे लक्षण असू शकते अशी भीती 

हातापासून तोंडापर्यंत पसरलेला एक घास 
अख्खी पृथ्वी पणाला लावून येऊ शकतो 

जंगलांच्या विचारापासून पक्षी बनतायत 

सापांच्या त्वचेपासून माणूस बनलाय अशी अफवा मी कालच ऐकली 

ही अफवा सत्य ठरेल अशी भीती 
श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )

जन्मापासूनचे भय जन्मण्याचे भय जन्माचे भय 

पांढऱ्या मश्रुमने झाकलेली प्रेते काय लपवतायत ?

यमके निळ्या जुळवणीला का घाबरतायत ?

एक पक्की चिरेबंदी कविता जन्मतानाच फ्रॅक्चर होतीये 

मुलांना जन्मताना कत्तलखान्यात जन्मल्याचं फिलिंग कोण देतंय ?

राजीव गांधींच्या चेहऱ्यावर गुलाब शिंपडून भय निघून जाईल ?

माझ्या जंगलाला दुसऱ्याच एरियाची फुले येतायत 

बर्फ स्थलांतर करतोय का 
कि माझा ट्रूऊंद्रा प्रदेश होत चाललाय ?

जन्मजात कुबड ही उत्क्रांती मानावी का ?

कोल्हापुरात सगळी मिरॅकल्स बेडरूममध्ये झोपतात 

स्मृतींच्या खलाशीगिरीत समुद्र गुप्त 

प्रवास पूर्वीसारखे लाईव्ह परफॉर्मन्स देत नाहीत 

माणसांना जन्मजातच अख्खी पृथ्वी माहीत झाली कि काय ?

जन्म आरंभ आहे जो घाबरत घाबरत येतो 

त्याला सर्वाधिक भीती बहुदा त्याच्याजवळच्या माहितीची हाय 
श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )

इस्पितळांना झोप येत नाहीये 
त्यांच्या निद्रानाशाची चौकशी चालू आहे 

मी डायग्नोसिस  म्हणत नाहीये 
चौकशी म्हणतोय 
हे  कृपया लक्ष्यात घ्या 

बुद्धाने स्वतःचे बूट कधीच काढून ठेवले 

ज्ञान वास्तववादी राहिलेले नाहीये 
आजकाल तेही कल्पना करायला शिकलंय 

तुम्ही म्हणू शकता कि पैसा ही कल्पना आहे 
पण रोग सांगतात कि पैसे वास्तव आहेत 

माणसांनी ड्रेसकोड घातले कि त्यांना नैतिक जाणीव रहात नाही 

कर्तव्य हॉन्टिंग करतं नाही असं नाही 
पण इस्पितळं बेटांच्यासारखी असतात 
आणि कुठलाही रोग सर्वात प्रथम 
तुम्हाला पृथ्वीपासून दूर करतो 

डॉक्टर्स सिग्रेटी पितात 
आणि पिऊ नका असं सांगतात 

चक्कर मारणे आणि चक्कर येणे ह्या दरम्यान काय असतं 

माणसांच्या बेडवर टिकलेल्या सावल्या पहात 
आयुष्य काढणे 
ह्यातील भयानकता कळतीये का तुम्हाला ?

निदान म्हणजे निसर्गाची चौकशी करणे 

मित्रांनी आणलेले बुके ऍक्टिंग असते कि प्रेम असते 
ह्याचीही चौकशी चालू आहे 

डुलकी घेणारे लोक तात्पुरते तळघरात जातात 

इस्पितळातले जिने सम्पत नाहीत 

कीटकांना मुंग्यांना डासांना ढेकणांना मज्जाव 

मज्जावरेषेवर दारूचे संपलेले ग्लास 

विश्व म्हणजे विश्वाचेच ऍक्शन पेंटिंग आहे 
ह्याचा साक्षात्कार इस्पितळात होतो 

हे एव्हढं सगळं मी एका दमात बोललो 
जेव्हा दोस्त म्हणाला 
" रांडेच्या , शेवटचे चार दिवस उरलेत 
शेवटचं बघ आणि कविता ऐकवून जा "

श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )

मातीला पडलेल्या सुरकुत्या म्हणजे झाडं 

आयुष्याची अथक चाल शेवटी बदक चालीला गाठतेच 

त्वचांचे सुवेझ कालवे अंतिमतः फॉसिल्स होतात 

केसांना बर्फ समजता येणं ही कला आहे 

बर्फात चंद्र मिक्स करता येणं तर महाकला 

खाटांना ढग समजून अलगद झोपी जावं 
आणि सकाळी उठतांना आभाळाला टूथब्रशवर थोडं अंथरावं 
आणि कवळी अशी साफ करावी जसे डाग म्हणून चांदणं पडलंय त्यांच्यातील दातांवर 

चालतांना असं चालावं जसं सुरत लुटायला चाललोय 
आणि बसावं असं जसा आपला राज्याभिषेक चाललाय 

सांधे दुखतात म्हणून मॅग्निफायिंग ग्लास लावू नये 
आणि खोकला आला तर मधुबालासारखं हसावं आणि खोकावं 
किंवा खोकावं आणि हसावं 

श्रीदेवीचे चोरून फोटो बघावेत 
आणि डिक्शनऱ्या रद्दीत जमा कराव्यात 

शब्दांचे अचूक अर्थ कळलेच पाहिजेत असं कुठाय ?


श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )

मरणाविषयी अफवा आहेत आणि मरणानंतरही अफवाच आहेत 

सस्पेन्शन ऑर्डर घ्यायची कि रिटायरमेंट घ्यायची 
आपल्या हातात आहे 

तंतूंच्यापेक्षा सुया अधिक झाल्यावर विणकामाचा हट्ट काय कामाचा ?

सावली बनत जाण्याचा उत्सव उत्साहाने का साजरा करू नये ?

चितांना स्कॉलरशिप डावलू शकत नाही 

संदर्भांसह स्पष्टीकरणे विरामात विलीन करतांना 
प्रश्नपत्रिका जाळता यायला हवी 

मरण शॉर्टकट आहे पुनर्जन्माचा 
एव्हढे कळले तरी पुरे . 
श्रीधर तिळवे नाईक 
 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून 
सर्वांना स्वतःसारखं बनवण्याचा प्रोग्राम 

सगळेच एकमेकासारखे दिसायला लागले 
तर स्वतःला ओळखता येईल का 

नशीब समज 
हा प्रोग्राम फेल जातो 

नाहीतर खाणारा तू बनवणारा तू 
कचरा उचलणारा तू बायको तू मुलं तू 

सत्ता अंतिमतः बोअर करते 
सपाट करते 

म्हणूनच शेजारचा तुझ्यासारखा नाही 
म्हणून स्वतःला भाग्यवान समज 

जगाचे सौंदर्य 
आपण एकमेकासारखे नाही आहोत 
म्हणून टिकून आहे 



श्रीधर तिळवे नाईक 
 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून 



1 comment:

  1. Your Website Is Nice And Informative. Please Keep Continue Such Kind Of Good Effort. If you want to watch sanju full movie visit our site http://allviralstorys.blogspot.com. Sanju is a Bollywood film directed by Rajkumar Hirani which features Ranbir Kapoor in the major role. The film is based on the life of famous film actor Sanjay Dutt. Ranbir Kapoor acts in the shoes of Sanjay Dutt and did a great job. The film received a positive response from the cinema fans.

    ReplyDelete